2026 ची महानगरपालिका निवडणूक : मुंबईच्या अस्तित्वाची लढाई
2026 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही. ही निवडणूक म्हणजे मुंबई कोणाच्या हातात राहणार, आणि उद्या हे शहर कोणत्या दिशेने जाणार, याचा थेट निर्णय आहे. मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी नाही; ती मराठी माणसाच्या कष्टांवर, त्याच्या संघर्षावर आणि स्वप्नांवर उभी राहिलेली नगरी आहे.
आज मात्र परिस्थिती वेगळी दिसते. मराठी माणूस आपल्या स्वतःच्या शहरात घरासाठी झगडतोय, नोकरीसाठी संघर्ष करतोय आणि अनेकदा दुय्यम असल्याची भावना अनुभवतोय. हे अचानक घडलेलं नाही. स्थानिक स्वराज्य कमजोर झालं की स्थानिक माणूस हळूहळू बाजूला पडतो, हा इतिहास आहे.
महानगरपालिका म्हणजे केवळ एक प्रशासकीय संस्था नाही. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, घरबांधणी, झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्थानिक रोजगार — आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेले निर्णय इथे घेतले जातात. हे निर्णय जर मुंबईकरांच्या गरजांऐवजी दूर बसून ठरवले गेले, तर त्याचा फटका सामान्य माणसालाच बसतो.
मुंबईची एक स्वतंत्र ओळख आहे. ही ओळख आहे मराठी भाषा, संस्कृती, सण-उत्सव, आणि स्वाभिमानाची. मुंबईने नेहमीच आपला आवाज उंच ठेवला आहे. जेव्हा-जेव्हा या शहराच्या आत्म्यावर गदा येण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा-तेव्हा मुंबईकरांनी जागृत होऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
म्हणूनच 2026 ची महानगरपालिका निवडणूक ही सत्ता बदलाची लढाई नाही, तर अस्मिता जपण्याची वेळ आहे. मतदान म्हणजे केवळ एक हक्क नाही, ती मोठी जबाबदारी आहे. “माझ्या एका मताने काय होणार?” हा विचार धोकादायक आहे, कारण इतिहास अनेकदा एका निर्णयाने बदललेला आहे.
आज प्रत्येक मतदाराने स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे — उद्या आपल्या मुलांना या शहरात सन्मानाने जगता येईल का? मराठी भाषा आणि संस्कृती टिकेल का? मुंबईचा कारभार मुंबईकरांच्या हातात राहील का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मतपेटीत दडलेली आहेत. मुंबई कोणाची आहे, हे बाहेरच्यांनी ठरवायचं नाही. मुंबईचा निर्णय मुंबईकरांनीच घ्यायचा आहे. कारण ही निवडणूक फक्त आजसाठी नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या भवित्यासाठी आहे.
मुंबईचा लढा हा अस्तित्वाचा आहे —
आणि तो जिंकण्याची जबाबदारी मुंबईकरांचीच आहे.
© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.
Comments
Post a Comment