प्रजासत्ताक दिन विशेष २०२६

आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केवळ ध्वज फडकवणे, घोषणा देणे किंवा सोशल मीडियावर देशभक्तीचे स्टेटस टाकणे एवढ्यावरच राष्ट्रप्रेम संपत नाही; उलट आज आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपल्याला ज्या भारताचे स्वप्न दाखवले गेले होते घटनात्मक मूल्यांवर उभा असलेला, समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुतेवर विश्वास ठेवणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा भारत—तो देश नेमका कुठे हरवला, हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिकाने स्वतःला विचारायला हवा. विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार, संशोधन, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मूलभूत मुद्द्यांऐवजी देश आज हिंदू-मुसलमान, धर्म-जात या फाटाफुटीच्या राजकारणात अडकलेला दिसतो. लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात, न्यायालयांच्या निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त केल्या जातात, आणि भ्रष्टाचाराचा भस्मासुर संपूर्ण व्यवस्थेला पोखरत असल्याचे चित्र वारंवार समोर येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विरोधी मतांचा सन्मान आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार हळूहळू संकुचित होत चालला आहे, ज्यामुळे देश हुकुमशाहीकडे झुकत असल्याची भीती वाटणे साहजिक आहे. खरा राष्ट्रविकास हा द्वेष, भीती किंवा भावनिक उन्मादावर उभा राहत नाही; तो उभा राहतो शिक्षणव्यवस्थेच्या मजबुतीवर, वैज्ञानिक संशोधनावर, तंत्रज्ञानाच्या योग्य वापरावर, पारदर्शक प्रशासनावर आणि संविधानाच्या प्रामाणिक अंमलबजावणीवर. भारत खरोखरच विकसित राष्ट्र व्हायचा असेल, तर अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान, घोषणांपेक्षा धोरण, आणि धर्माच्या राजकारणाऐवजी माणूस केंद्रस्थानी ठेवावा लागेल.

आज उतू जाणारे राष्ट्रप्रेम फक्त एका दिवसापुरते, समारंभापुरते किंवा भाषणांपुरते मर्यादित न राहता ते वर्षभर, ३६५ दिवस जिवंत राहिले मतदानाच्या वेळी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना, प्रश्न विचारताना आणि संविधानाचे रक्षण करताना तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उदय होईल; अन्यथा राष्ट्रप्रेम हे फक्त दिखावा ठरेल आणि लोकशाही हळूहळू नावापुरतीच उरेल.

राष्ट्र म्हणजे केवळ भूभाग नाही, झेंडा नाही किंवा घोषणा नाही; राष्ट्र म्हणजे संविधान, नागरिक आणि त्यांची जाणीव. जेव्हा नागरिक विचार करतात, प्रश्न विचारतात आणि अन्यायाविरुद्ध उभे राहतात, तेव्हाच राष्ट्र मजबूत होतं. प्रजासत्ताक दिन हा सत्तेचा उत्सव नसून लोकशाही जिवंत आहे का याची आठवण करून देणारा दिवस आहे. आज जर आपण मौन स्वीकारलं, तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही. म्हणूनच राष्ट्रप्रेम हे भीतीतून नव्हे, तर विवेकातून जन्माला आलं पाहिजे—कारण प्रश्न विचारणारा नागरिकच लोकशाहीचा खरा पहारेकरी असतो. 🇮🇳

© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचा "दादा" हरपला!

2026 ची महानगरपालिका निवडणूक : मुंबईच्या अस्तित्वाची लढाई