सोशल मीडिया आणि आपली बदलती मानसिकता!


आजच्या डिजिटल युगात आपण हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये इतके गुरफटून गेलो आहोत, की वास्तव आणि आभासी जग यामधली सीमारेषाच धूसर झाली आहे. सोशल मीडिया हा केवळ संवादाचं साधन राहिलेलं नाही, तर तो आपल्या विचारसरणीचा, भावनांचा आणि निर्णयक्षमतांचा मार्गदर्शक बनला आहे. पण हा मार्ग खरोखर योग्य दिशेला नेतोय का, हा प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे.
पूर्वी माणूस अनुभवांवर, कुटुंबाच्या सल्ल्यावर आणि स्वतःच्या विवेकबुद्धीवर निर्णय घेत असे. आज मात्र एका व्हिडिओवर, एका पोस्टवर किंवा एका ट्रेंडवर आपलं मत तयार होतं. कोणीतरी काहीतरी बोललं, आणि आपण ते न विचारता शेअर केलं ही सवय आपल्या विचारक्षमतेला हळूहळू कुंठित करते आहे.
सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य बहुतेक वेळा वास्तव नसतं, तर ते एक सुंदरपणे सादर केलेलं खोटं चित्र असतं. लोक आपल्या आयुष्यातील फक्त आनंदाचे, यशाचे क्षण दाखवतात, आणि त्यामागचं दुःख, संघर्ष, अपयश लपवतात. हे पाहून इतरांच्या मनात तुलना निर्माण होते "माझं आयुष्य असं का नाही?" ही भावना नैराश्य, असंतोष आणि आत्मविश्वास कमी होण्याचं कारण बनते.
याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. एखाद्या अपघाताचा व्हिडिओ पाहून मदत करण्याऐवजी तो शूट करून व्हायरल करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. एखाद्या दुःखद घटनेवर सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यावर मीम्स बनवले जातात. हे केवळ समाजाचं नव्हे, तर आपल्या मनाचंही अध:पतन आहे.
सोशल मीडिया कंटेंट आपल्याला जलद, सतत आणि वरवरचं समाधान देतो. त्यामुळे आपली सहनशक्ती कमी होते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता घटते. आपण खोल विचार करण्यापेक्षा पटकन निष्कर्ष काढायला शिकतो. ही मानसिकता केवळ वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर समाजाच्या प्रगतीलाही अडथळा ठरते.
परंतु, दोष फक्त सोशल मीडियाचा नाही तो वापरणाऱ्याचाही आहे. आपल्याकडे विवेकबुद्धी आहे, पण आपण तिचा वापर करतो का? आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो त्यावर विचार करतो का? की फक्त ट्रेंडच्या मागे धावत राहतो?
आज गरज आहे ती जाणीवपूर्वक वापराची.
सोशल मीडिया वापरा, पण त्याचा गुलाम होऊ नका.
माहिती घ्या, पण तिची सत्यता तपासा.
मनोरंजन करा, पण आपल्या मानसिकतेची किंमत देऊन नाही.
शेवटी, एक गोष्ट लक्षात ठेवा
मोबाईल तुमच्या हातात आहे, पण तुमचं मन त्याच्या ताब्यात जाऊ देऊ नका.
कारण, जर विचार करण्याची क्षमता हरवली, तर माणूस फक्त “युजर” उरतो विचारवंत नाही.

© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचा "दादा" हरपला!

2026 ची महानगरपालिका निवडणूक : मुंबईच्या अस्तित्वाची लढाई

प्रजासत्ताक दिन विशेष २०२६