मराठी चित्रपट सृष्टीची नेहमीच होणारी प्रतारणा आणि संघर्ष!

भारतीय चित्रपटसृष्टी ही विविध भाषांनी, विविध संस्कृतींनी आणि असंख्य प्रतिभावान कलाकारांनी समृद्ध आहे. प्रत्येक भाषेचा सिनेमा ही त्या प्रदेशाची ओळख, संस्कृती आणि भावना जपणारा आरसा असतो. मात्र अलीकडच्या काळात एक प्रश्न वारंवार मनाला टोचतो तो म्हणजेच मराठी चित्रपटांना खरोखरच समान संधी मिळते आहे का?

सध्या मोठ्या हॉलीवूड चित्रपटांना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये भरघोस शो दिले जात आहेत. लोकप्रिय पात्रांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होताच अनेक मल्टिप्लेक्समध्ये दिवसातून असंख्य शो लागतात. यात व्यावसायिक कारणे असू शकतात, कारण थिएटर चालवताना आर्थिक गणित महत्त्वाचे असते. पण याच वेळी अनेक मराठी चित्रपटांना अत्यंत मर्यादितच शो मिळतात, ही खरी वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही.

एका मराठी चित्रपटामागेही तितकीच मेहनत, तितकीच स्वप्ने आणि तितकाच संघर्ष असतो. लेखक सातत्याने कथा घडवतो, दिग्दर्शक प्रत्येक दृश्यावर मेहनत घेतो, कलाकार आपल्या भूमिकेत जीव ओततात आणि संपूर्ण तांत्रिक टीम दिवस-रात्र काम करते. पण पडद्यावर येण्याची वेळ आली की त्यांच्या वाट्याला मोजकेच शो येतात. अशा परिस्थितीत प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचणार तरी कसा? ह्याचा विचार व्हायला हवा.

नंतर जेव्हा चित्रपटाने अपेक्षित व्यवसाय केला नाही, तेव्हा त्याला अपयशी ठरवले जाते. पण खरा प्रश्न असा आहे की, पुरेशी संधी न मिळालेल्या चित्रपटाच्या यश-अपयशाचा न्याय त्यांना कसा करणार? ज्याला सुरुवातीलाच धावण्यासाठी पुरेशी जागा मिळाली नाही, त्याच्या वेगावर प्रश्नचिन्ह लावणे कितपत योग्य आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

मराठी सिनेमा हा फक्त मनोरंजनाचे साधन नाही. तो आपल्या मातीतल्या कथा सांगतो. आपल्या बोलीभाषा, परंपरा, नाती, संघर्ष, इतिहास आणि सामाजिक वास्तव यांना तो पडद्यावर जिवंत करतो. अनेक मराठी चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवतात, समीक्षकांकडून दाद मिळवतात, पण आपल्या राज्यातच त्यांना पुरेशी स्क्रीन आणि शो मिळत नसतील, तर ही खरोखरच विचार करण्यासारखीच बाब आहे.

याचा अर्थ असा अजिबात नाही की परदेशी किंवा इतर भाषांतील चित्रपटांना विरोध करावा. चांगल्या चित्रपटाचे स्वागत प्रत्येक प्रेक्षकाने केलेच पाहिजे. पण त्याच वेळी स्थानिक भाषेच्या चित्रपटांनाही न्याय्य मिळणे तितकेच आवश्यक आहे. स्पर्धा असावी, पण ती समान संधीवर आधारित असावी हेच खरं.

यामध्ये प्रेक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. आपण अनेकदा सोशल मीडियावर मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करतो. पण जेव्हा एखादा चांगला मराठी चित्रपट थिएटरमध्ये येतो, तेव्हा आपण त्यासाठी तिकीट काढतो का? आपल्या एका तिकिटामुळे फक्त एका चित्रपटाला फक्त आधार मिळत नाही, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला बळ मिळते.

आजची शोकांतिका ही हॉलीवूड चित्रपट यशस्वी होत आहे म्हणून नाही. तर खरी शोकांतिका अशी आहे की अनेक मराठी चित्रपटांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधीच मिळत नाही. पडद्यावर जागा मिळण्याआधीच त्यांचा प्रवास संपतो. ही परिस्थिती बदलली नाही, तर भविष्यात अनेक उत्कृष्ट कथा कागदापुरत्या मर्यादीत राहतील आणि अनेक प्रतिभावान कलाकारांना त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळणार नाही.

मराठी चित्रपटसृष्टीला कोणत्याही विशेष वागणुकीची गरज नाही. गरज आहे ती फक्त न्याय्य संधीची. कारण पडदा जितका मोठा आहे, तितकाच मोठा प्रत्येक भाषेचा आणि प्रत्येक कथेचा हक्क आणि दर्जा आहे. जेव्हा मराठी चित्रपटांना त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य स्थान मिळेल, तेव्हाच आपण भारतीय चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असल्याचा अभिमान बाळगता येईल.

© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.

Comments