न पचणारा तुकाराम!
आजच्या काळात प्रत्येकाला ऑरगॅनिक (सेंद्रिय)भाजीपाला हवा असतो. शेतकऱ्याने पिकवलेलं वांगं थोडं वाकडं असेल, टोमॅटोवर एखादा डाग असेल किंवा भाजीवर किडीचा ठसा असेल, तर आपण लगेच नाक मुरडतो. पण शहरात पॅकिंगमध्ये मिळणारे, आकर्षक दिसणारे आणि अनेक दिवस टिकणारे पदार्थ मात्र सहज स्वीकारतो. मग प्रश्न पडतो आपल्याला खरंच अस्सलपणा हवा आहे का? की फक्त अस्सलपणाचं सुंदर पॅकेजिंग?
निसर्गात प्रत्येक फळ एकसारख्या आकाराचं नसतं. मातीशी जोडलेल्या पिकावर निसर्गाच्या खुणा असतात. बाहेरून ओबडधोबड दिसणाऱ्या त्या भाजीमागे शेतकऱ्याचा घाम, मेहनत आणि संघर्ष असतो. म्हणूनच अस्सल गोष्ट नेहमी सुंदर आणि परिपूर्ण दिसेलच असं नाही.
हीच गोष्ट माणसांनाही लागू होते. काही माणसं स्पष्ट बोलतात, नियमांवर ठाम राहतात आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करतात. त्यामुळे ती आपल्याला कठोर वाटू शकतात. तुकाराम मुंडे यांच्याबाबतही समाजात अशीच वेगवेगळी मतं आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचं कोणी कौतुक करतं, तर कोणाला त्यांची शैली कठोर वाटते. मात्र एखादी व्यक्ती आपल्याला आवडते की नाही, यापेक्षा तिच्या कामाचं मूल्यमापन करणं महत्त्वाचं आहे. लोकप्रिय असणं आणि योग्य काम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
शेतकऱ्याचं आयुष्य पाहिलं तर संघर्ष जणू त्याच्या नशिबातच लिहिलेला दिसतो. पेरणी करताना पाऊस पडेल का? पीक चांगलं येईल का ?बाजारभाव मिळेल का ?आणि केलेला खर्च निघेल का ? याची खात्री नसते. कधी उत्पादन भरपूर होतं, पण भाव पडतो; तर कधी भाव चांगला असतो, पण उत्पादन हाताशी राहत नाही. म्हणूनच शेतकऱ्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे खर्च निश्चित आणि उत्पन्न अनिश्चित.
शेतकरी चळवळीच्या काळात त्याच्या प्रश्नांवर अनेक आवाज उठतात. हमीभाव, कर्ज, वीज, पाणी, पीकविमा आणि बाजारभाव यावर मोठमोठी आश्वासनं दिली जातात. पण हेच आवाज सत्ता मिळाल्यानंतर किती ताकदीने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहतात? हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून; तो संपूर्ण व्यवस्थेला विचारण्याची गरज आहे!
आपण बाजारातील भेसळीबद्दल बोलतो, पण आपल्या मतदानातही भेसळ होतेय ह्या कडे दुर्लक्ष करतो... आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे काम, त्याची भूमिका आणि जनतेसाठी केलेली कामगिरी आपण खरंच तपासतो का?
लोकशाहीत मतदान करून आपली जबाबदारी संपत नाही. उलट, तिथूनच खरी जबाबदारी सुरू होते.
मुळात शेतकरी हा केवळ मतदार नाही; तो आपल्या अन्नव्यवस्थेचा आधार आहे. म्हणून पुढच्या वेळी एखादं वाकडं वांगं किंवा डाग असलेला टोमॅटो पाहताना त्याला नाकारण्याआधी विचार करु या कदाचित ते दिसायला परिपूर्ण नसेल, पण त्यामागची मेहनत मात्र पूर्णपणे अस्सल असेल.
राजकारणातही आपल्याला याच अस्सलपणाची गरज आहे.
कारण मातीशी नातं असलेलं बीज बाहेरून साधं दिसलं, तरी त्याच्यात उगवण्याची ताकद असते.
आणि भेसळमुक्त समाज हवा असेल, तर सुरुवात बाजारातून नव्हे ,आपल्या विचारांपासून आणि आपल्या मतदानाच्या निवडीपासून करावी लागेल. आपण जर आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर आपल्याला त्याची गंभीरता लक्षात येईल.
आणि त्यामुळे ह्या सगळ्यांवर वचक बसण्यासाठी प्रत्येक शासन व्यवस्थेवर एक तरी तुकाराम हवाच !
© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.
Comments
Post a Comment