मराठी शाळेतील शिक्षण मूळ प्रगतीचे लक्षण!

आज आपल्या समाजासमोरचा एक गंभीर प्रश्न म्हणजे मराठी शाळांकडे पाहण्याची बदललेली मानसिकता. माझ्या एका मित्राच्या गावात काही पालकांना आपल्या मुलांना मराठी शाळेत घालायला कमीपणा वाटतो. “इंग्रजी शाळेत टाकलं तर मुलाचं भविष्य चांगलं होईल”, असं त्यांचं म्हणणं आहे. इंग्रजी शिकणं चुकीचं नाही. आजच्या स्पर्धेच्या जगात इंग्रजीचं महत्त्व नक्कीच आहे. पण इंग्रजी माध्यम म्हणजेच उत्तम शिक्षण आणि मराठी माध्यम म्हणजे कमी दर्जाचं शिक्षण, हा समज मात्र चुकीचा आहे हे लक्षात घ्यायला हवं.

आपण एक गोष्ट विसरत आहोत. मुलाचं भविष्य केवळ शाळेच्या माध्यमावर ठरत नाही. त्याची मेहनत, जिज्ञासा, शिक्षणाची गुणवत्ता, पालकांचा सहभाग, शाळेचं वातावरण आणि त्याला मिळणाऱ्या इतर संधी या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. मराठी शाळेत शिकलेलं मूल डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, उद्योजक किंवा मोठं कलाकार होऊ शकत नाही का? नक्कीच होऊ शकतं. कारण यशाची परि भाषा एकच नसते.
आज अनेक पालकांना मुलाला मराठी शाळेत घालण्यापेक्षा “लोक काय म्हणतील?” याची जास्त चिंता वाटते. शेजाऱ्याने इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला की आपणही घेतो. मुलाला खरंच काय आवश्यक आहे? त्याची क्षमता काय आहे? त्याला कोणत्या वातावरणात चांगलं शिकता येईल? यापेक्षा समाजात आपली प्रतिष्ठा कशी दिसेल ? याला महत्त्व दिलं जातं. हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे.
मुलाला मराठी शाळेत घातलं म्हणजे त्याला इंग्रजीपासून दूर ठेवणं नव्हे. उलट मातृभाषेत मजबूत पाया तयार करून त्यासोबत चांगलं इंग्रजी शिकवता येते. आपल्या मुलाला मराठीच म्हणजेच मातृभाषेचे मूळ भक्कम असेल तर इंग्रजीचा पाया सुद्धा मजबूत होतो हे ही लक्षात घ्यायला हवं. प्रश्न “मराठी की इंग्रजी?” असा नसून “मुलाला दर्जेदार शिक्षण कसं मिळेल?” असा असायला हवा.
मराठी शाळांमध्ये काही कमतरता असतील तर त्या नक्कीच दूर केल्या पाहिजेत. सुविधा, तंत्रज्ञान, इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक अभ्यासपद्धती यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. पण शाळेच्या समस्या आहेत म्हणून संपूर्ण मराठी माध्यमाला कमी लेखणं हा त्यावर उपाय नाही.
आपण मराठीचा अभिमान फक्त सोशल मीडियावरील पोस्टमध्ये व्यक्त करून उपयोग नाही. तो आपल्या कृतीतही दिसायला हवा. ज्या भाषेत आपण पहिल्यांदा बोलायला, विचार करायला आणि जग समजून घ्यायला शिकलो, त्या भाषेत शिक्षण घेणं कमीपणाचं कसं असू शकतं?
इंग्रजी येणं ही प्रगतीची खूण असू शकते; पण मराठी विसरणं ही प्रगतीची अट असू शकत नाही.
मराठी शाळा वाचवण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाने आपली मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. कारण प्रश्न फक्त एका शाळेचा नाही; प्रश्न आपल्या पुढच्या पिढीला मुळांशी जोडून जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता देण्याचा आहे !

© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.

Comments