मी बाप्पा बोलतोय!


गणपती बाप्पा म्हटलं की प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह आणि भक्तीची भावना निर्माण होत असते. तुम्ही माझ्या आगमनासाठी तुम्ही भरपूर सजावट करता, ढोल-ताशे वाजवता, आरत्या करता आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय करून टाकता. तुमच्या या प्रेमाने मीही खूप आनंदित होतो. पण आज गणराज म्हणजेच तुमचा लाडका बाप्पा म्हणून मला माझ्या भक्तांशी एका गंभीर विषयावर बोलायचे आहे.

आज माझ्या मूर्तीची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. २०, २२, २५, २७ फूट उंचीच्या मूर्ती उभारण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. पण माझ्या भक्तांनो, मला खरं खरं सांगा माझी मूर्ती जितकी उंच, तितकी तुमची भक्ती मोठी असते का? माझी मूर्ती जितकी भव्य, तितकी श्रद्धा श्रेष्ठ असते का?  नाही ना! माझी खरी उंची माझ्या मूर्तीमध्ये नाही, तर तुमच्या विचारांमध्ये आहे.
माझी उंच मूर्ती रस्त्यावरून नेताना पूल, जवळ जवळच्या इमारती, विजेच्या तारा, अरुंद रस्ते आणि इतर अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्या वेळी माझ्या सुरक्षित आगमनापेक्षा माझी उंचीच मोठी चिंता बनते. माझ्या भक्तांनो, मला मंडपापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यापेक्षा माझी मूर्ती किती मोठी दिसेल, याला महत्त्व एवढ महत्त्व का?
भुलेश्वर येथे घडलेली दुर्घटना याच विचारांना हादरा देणारी आहे. २२ फूट उंचीची माझी मूर्ती कोसळून अनेक भाविक जखमी झाले आणि दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातील एक भाबडा भक्त माझी मूर्ती सावरण्यासाठी दोन हातांनी पुढे झाला; पण त्याच प्रयत्नात त्याचा जीव गेला. ही घटना माझ्या मनालाही चटका लावून गेली. ज्या भक्ताने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, त्याच भक्ताचा जीव माझ्यामुळे जावा, हे मला कधीच मान्य नव्हतं.
मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आज मला अनेकदा माझ्या पारंपरिक, शांत आणि प्रसन्न रूपापेक्षा सिक्स-पॅक, बलाढ्य शरीर आणि रागीट चेहऱ्याच्या रूपात साकारले जाते. कलात्मक कल्पना बदलणे चुकीचे नाही; पण माझ्या रूपातून कोणता संदेश समाजाला मिळतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी विघ्नहर्ता आहे, बुद्धीची देवता आहे. माझ्या रूपात शांतता, करुणा आणि प्रसन्नता आहे. माझी ताकद माझ्या शरीरात नाही, तर माझ्या विचारांमध्ये आहे.
म्हणून माझ्यासाठी मोठं काही करायचं असेल तर माझी मूर्ती मोठी करू नका; माणुसकी मोठी करा. एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाला मदत करा, गरजू व्यक्तीच्या उपचारासाठी हात द्या, एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवा. माझ्या नावाने होणारा उत्सव भव्य असण्यापेक्षा अर्थपूर्ण असणे महत्त्वाचे आहे.
माझ्या भक्तांनो, माझ्या आगमनाच्या वेळी प्रत्येक भक्त सुरक्षित असणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आरती असेल. माझ्या विसर्जनानंतर प्रत्येक जण सुखरूप घरी पोहोचणे हाच माझ्यासाठी सर्वात मोठा नैवेद्य असेल.
माझी मूर्ती रस्त्यावर किती उंच उभी आहे, यापेक्षा तुमची माणुसकी समाजात किती उंच उभी आहे, हे मला पाहायच आहे.
कारण मला भव्यतेचा दिखावा नको…
मला भक्ती, विवेक, माणुसकी आणि माझ्या प्रत्येक भक्ताचा सुरक्षित श्वास हवा आहे.
चला भेटू लवकरच...❤️🤗

© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.

Comments